सोलापूर: जिल्हा विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या बचत गटाच्या चळवळीला मोठी गती मिळाली आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या साहित्यांचे ऑनलाईन मार्केटिंग सुरू झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी दिली.
जिल्ह्यात महिला बचत गटाची चळवळ चांगलीच रूजली आहे. उमेदच्या माध्यमातून या बचत गटांना जवळपास ११० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना चांगलीच मागणी आहे; पण कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात मार्केटिंग थांबले होते पण यावर ना उमेद न होता, ऑनलाईन मार्केटिंगचा पर्याय शोधण्यात आला. १५ मेपासून बचत गटांची उत्पादने ऑनलाईन मार्केटिंगवर आली आहेत. सद्य:स्थितीत २०६ उत्पादनांचे छायाचित्र ऑनलाईनवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यात सोलापुरी ज्वारीची कडक भाकर, शेंगाची चटणी, काळा मसला, लसूण, कांदा चटणी, पापड, लोणचे, लाडू असे खाद्यपदार्थ तर घोंगडी, बांगड्या, तयार कपडे, कलाकुसर केलेले साहित्य, लाकडी खेळणी अशा वस्तूंचा समावेश आहे. कडक भाकरी व शेंगा चटणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ॲपवर प्रत्येक तालुक्याची खासीयत असलेले उत्पादन विक्रीस उपलब्ध केले आहे.
-
येथे सुरू झाले मार्केट
महिला बचत गटाचे साहित्य स्नॅपडिल, माय दुकानवर विक्रीस उपलब्ध झाले आहे. रुक्मिणी या नावाचा ब्रँड तयार करण्यात आला आहे. ॲमेझॉनने या साहित्याची दखल घेतली असून, सांगोल्याची घोंगडी व इतर उत्पादनांचे छायाचित्र घेण्यासाठी पथक लवकरच सोलापुरात येणार असल्याचे गुंडे यांनी सांगितले.
-
लॉकडाऊनमध्येही रोजगार
लॉकडाऊनमध्येही महिला बचतगटाच्या सदस्यांनी साखर कारखान्यांना दूध, सेंद्रीय भाजीपाल्याचा पुरवठा केला तसेच कापडी मास्कची निर्मिती करून रोजगार मिळविला. विंचूरच्या बचत गटास पुण्यातील कंपनीने गणवेश पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यास महिला बचतगट अग्रेसर आहेत.