सोलापूर : देशात सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा निर्माण झाला पाहिजे. सर्व धर्म व समाजाने एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याची गरज आहे, असे झाल्यास देशाचा सर्वांगिन विकास होईल असा संदेश सय्यद फजुल्लाह खतीब सहाब यांनी दिला.
रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते. पवित्र कुरान केवळ पुस्तक नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पृथ्वीवरील सर्व मानव जात एका फुलदानीतील फुलाप्रमाणे आहेत, त्यात सर्व फुले असतील तर ती शोभून दिसते.
तसेच सर्व धर्मीय लोकांचे आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांप्रती आदर, प्रेम भावना ठेवली पाहिजे असे सय्यद फजुल्लाह खतीब सहाब म्हणाले. आदीलशहा ईदगाह येथे सकाळी ८.३० पासून मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत होते. ९.१५ वाजता सर्व बांधव जमा झाले त्यानंतर ९.३० वाजता नमाज पठणाला सुरूवात झाली. १०.२० वाजता नमाज संपली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदगाहतर्फे उत्तम नियोजन- आदीलशहा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.- नमाजसाठी लहान मुले स्वत:चे वडील व अन्य नातेवाईकांसोबत आले होते. नमाज नंतर लहान मुलेही एकमेकांना शुभेच्छा देत होते.- पोलिसांनी नवी वेस पोलिस चौकी व नरसिंग गिरजी मिल पासून वाहतूकीचा मार्ग बंद केला होता.