शीतलकुमार कांबळे
सोलापूर : मार्च महिन्यापासून सोलापूरकर कडक ऊन्हाला तोंड देत आहेत. यात आणखी वाढ होत असून सोमवार ६ मे रोजी पारा ४४.१ अंश सेल्सिअसवर होता. पुढील काही दिवस तापमान हे ४२ अंशाच्यावरच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
रविवार ५ मे रोजी सोलापूरचे तापमान हे ४४.४ अंश सेल्सिअस इतके होते. सोमवार ६ मे रोजी यात किंचित घट होऊन पारा ४४.१ अंशावर होता. एका दिवसात फक्त ०.३ अंश सेल्सिअस इतकी घट झाली. वाढलेल्या तापमानमुळे सोलापूरकरांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात उकाडा वाढत आहे.
५ मार्चपासून सोलापूरचा कमाल पारा ३८ अंश सेल्सिअसच्या घरात असून ९ मार्च रोजी ३९.४ अंश सेल्सिअसवर गेला होता. १८ एप्रिल रोजी ४२.०, ३० एप्रिल रोजी ४४.० अंश सेल्सिअस इतके तापमान होते. ४ मे रोजी ४३.४ तर ५ मे रोजी ४४.४ अंशावर तापमान गेले. मंगळवार ७ मे रोजी सोलापुरात मतदान असून मतदारांना ऊन्हाचा सामना करावा लागणार आहे.