एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कर्देहळ्ळी या एकाच गावात ३१ रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले. कर्देहळ्ळी गाव आता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अन्य गावांतील संख्याही वाढत आहे. आलेगाव आणि हत्तूर या दोन्ही गावात वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला. आलेगावमध्ये चार रुग्ण आढळले. त्यापैकी रामू पुल्लूर (वय ६५) यांचा मृत्यू झाला. येथील रुग्णाच्या घराशेजारील परिसर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर करण्यात आले.
हत्तूरमध्ये किराणा दुकानदार, दूधवाला, रिक्षाचालक अशा ७७ व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सलग दोन दिवस केलेल्या तपासणीत आणखी तीन रुग्ण आढळल्याने पाच ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले.
-----
ग्रामपंचायत, गावाची वेस सील हत्तूर ग्रामपंचायतीचा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण ग्रामपंचायत सील करण्यात आली. गावाची वेस झोपडपट्टीतील जाफर शेख यांच्या घराचा परिसर, अत्तार मशिदी शेजारचा परिसर, चंद्रशेखर निगडी यांचे घर अशा पाच ठिकाणी कंटेन्मेंट झोनचा फलक लावण्यात आला आहे.
-------
ग्रामस्थांमध्ये कोरोना विषयक जागृती आली असली तरी संपर्कामुळे अनेकांना लागण झाली होती. गेल्या तीन दिवसांत कडक निर्बंध लादल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.
- संजय पाटील, ग्रामसेवक, हत्तूर
-----