सोलापूर : सोलापूरच्या विकासाला आणि शहरातील जड वाहतूक कायमची हद्दपार होण्यासाठी सोलापूरच्या शहराबाहेरून रिंगरूट अर्थात बाह्यवळणाची गरज आहे. ही गरज नियोजित सूरत-चेन्नई कॉरिडॉर पूर्ण करणार आहे. कॉरिडॉरच्या प्रकल्पात हत्तूर ते तांदूळवाडी तसेच केगाव ते तांदूळवाडी असे एकूण ६० किलोमीटर रिंगरूटची तरतूद करण्यात आली आहे. हा रिंगरूट पूर्ण झाल्यास शहरातील जड वाहतूक शंभर टक्के थांबणार आहे.
हत्तूर ते तांदूळवाडी असे २८ कि.मी. तसेच असून त्यासोबत केगाव ते तांदूळवाडी असे ३२ कि.मी. रिंगरूटचे नियोजन आहे. सध्या हत्तूर ते केगाव हा २१ कि.मी.चा बायपास रस्ता पूर्ण झाला असून नव्या नियोजित रिंगरूटमुळे हत्तूर ते केगाव, केगाव ते तांदूळवाडी तसेच तांदूळवाडी ते हत्तूर असा नव्वद कि.मी.चा रिंगरूट पूर्ण होईल.
बारा हजार कोटींची तरतूद
उस्मानाबाद आणि सोलापूरमधून हा महामार्ग नियोजित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून ८५ कि.मी. तसेच सोलापुरातून १५३ कि.मी. असे एकूण २३८ किलोमीटरचा महामार्ग नियोजित आहे. यासाठी १२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून भूसंपादनासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद आहे.
............................