सोलापूर : उद्यम इंक्युबेशन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इनक्युबेशन उपक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत चांगली बिझनेस आयडीया असणाऱ्या पदवीधर तरुणांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन केंद्राने आणि सारथी, पुणे (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे) यांनी नुकतीच सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इनक्युबेशन उपक्रमाची घोषणा केली आहे. सारथी ही वंचित घटकासाठी काम करणारी शासकीय यंत्रणा असून ही स्कीम मराठा, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या विशेष सामाजिक घटकांसाठी असल्याचे सारथीतर्फे सांगण्यात आले.
यासाठी विद्यार्थी किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. निवडलेल्या १० उत्तम संकल्पना आलेल्या नवउद्योजकांना एका वर्षासाठी इंक्युबेशन केंद्रामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. त्यांना इनक्युबेशनच्या सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. १६ एप्रिलपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अर्ज करता येणार असून त्यांनी सारथीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या नाविन्यता, नवउपक्रम आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी केले आहे.----------१० नवउद्योजकांना मार्गदर्शनया उपक्रमाच्या अंतर्गत उद्यम इंक्युबेशनकेंद्राच्या दहा नवउद्योजकांना सामावून घेण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालयामार्फत 4 इनक्यूबेशन केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विद्यापीठाचे उद्यम इंक्युबेशन केंद्राला देखील स्थान देण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.