मोहन डावरे
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून, रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. याचबरोबर गेल्या २० दिवसांत १२५ जणांनी प्राण गमावला आहे. त्यामुळे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यावर कडक लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढवली आहे. बाधित रुग्णसंख्या सापडण्याची मोहीम फेब्रुवारीपासून सुरू झाली असली तरी दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि या काळातच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. निवडणूक १७ एप्रिलला झाली असली तरी तयारी मात्र फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. या कालावधीत कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरू होते.
६ एप्रिल २०२१ पूर्वी पंढरपूर तालुक्यात अवघे ९ हजार २६० सक्रिय रुग्ण होते. २५५ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर मंगळवेढा तालुक्यात अवघे २०६० सक्रिय रुग्ण होते. तर ५२ जणांना प्राण गमवावा लागला होता. हीच आकडेवारी १७ एप्रिल २०२१ या निवडणुकीच्या दिवसापर्यंत वेगाने वाढली. त्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ६८०, तर मृत्यूची संख्या २६५ पर्यंत गेली होती. मंगळवेढा तालुक्यातही रुग्णसंख्या वाढून २६०० वर पोहोचली, तर मृत्यूही ७० च्या आसपास होते.आजअखेर पंढरपूर तालुक्यात १६ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले तर ३३५ जणांचा मृत्यू झाला. मंगळवेढा तालुक्यात १५ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असून, ११० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. ...................कोट ... पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. अख्खी घरे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक सुपरस्प्रेडर ठरत आहेत. - सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर