कुरुल : कामावर न जाता दारू पिऊन सतत पत्नी, आई, मुलीस मारहाण करणाºया कुरुलच्या अण्णासाहेब घोडके याचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणातील फरार आरोपी सुनील इरण्णा सुतार (वय ३०) याला पोलिसांनी अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. नातेवाईकास भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. मोहोळ न्यायालयाने त्याला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस सूत्रानुसार कुरुल येथील मयत अण्णासाहेब घोडके हा कामावर न जाता घरी बसून दारू पिऊन पत्नी, मुलगी व आईला सतत त्रास देऊन मारहाण करीत होता. त्यामुळे चिडून जाऊन आई व बहिणीने मावस भावासोबत कट रचून खुनाची सुपारी दिली आणि घोडके याचा खून केला होता. या प्रकरणात सात महिन्यांपासून फरारी असलेल्या सुनील इरण्णा सुतार ( वय ३०,रा.रामपूर, ता.अक्कलकोट) या आरोपीस काल मंगळवारी (दि .१८) रात्री उशिरा कामती पोलिसांनी सोलापूर येथे सापळा लावून अटक केली. बुुधवारी मोहोळ येथे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुरुल येथील अण्णासाहेब सुरेश घोडके याच्या खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच मृताच्या आई व बहिणीला अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून तपासाची चक्रे वेगाने फिरवत मयताचा मावसभाऊ विठ्ठल मनोहर बिराजदार (रा.बोरीउमरगे, ता.अक्कलकोट ) व राजकुमार कुंडलिक बिराजदार (रा. इटगी, ता.अक्कलकोट) या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी सुनील इरण्णा सुतार याचाही सहभाग असल्याचे दिसून आले होते. कामती पोलिसांनी अनेकवेळा त्याच्या मागावर राहून अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फरारी होत होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना हा फरार आरोपी नातेवाईकांना भेटण्यासाठी सोलापूर येथे एका रुग्णालयात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे व पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे यांनी हॉस्पिटल परिसरात कामती पोलिसांचा सापळा रचून शिताफीने अटक केली आहे.