वडवळ : भांबेवाडी येथील मगरधन नवनाथ साबळे... ३१ वर्षांचा तरुण... शिक्षण केवळ नववीपर्यंतच... व्यवसाय टमटमचालक... ग्रामपंचायत निवडणूक लागली अन् अनु. जातीच्या प्रभाग १ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता सरपंचपदाचीही संधी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे टमटम चालवीत असताना त्यांनी माणसे जोडली अन् आता गावकऱ्यांनी गावकारभार करण्याची संधीच दिली आहे.
भांबेवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली झाली. मात्र, आजवर एकदाही अनु. जातीच्या उमेदवाराला संधी मिळाली नव्हती. या वेळेस सरपंचपद अनु. जाती प्रवर्गसाठी राखीव झाले. स्थापनेपासून आजवर एकदाही बिनविरोध निवडणूक झाली नव्हती; पण या वेळेस प्रथमच ही जागाही बिनविरोध झाली अन् हा पहिला मान साबळे यांना मिळाला. सरपंचपदाची माळ गळ्यात पडली.
थोरला शिपाई अन् धाकटा भाऊ सरपंच
साबळे यांचे वडील नवनाथ साबळे यांनी याच ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून सेवा केली अन् निवृत्त झाले. त्यानंतर आता त्यांचा थोरला भाऊ रघुनाथ हे शिपाई म्हणून काम करत आहेत. अशा स्थितीत आता साबळे हे सरपंच झाले आहेत. थोरला भाऊ शिपाई अन् धाकटा भाऊ सरपंच, अशी भावनिक निवड या गावात प्रथमच झाली आहे. एका शिपायाचा मुलगा आता सरपंच झाला, याचा आनंद साबळे कुटुंबातील सर्व सदस्यांना झाला आहे. तरीपण टमटम चालवणार... या व्यवसायामुळेच प्रगती झाली. आता सरपंच झालो तरी गावचा कारभार पाहत टमटमही चालवणार आहे. ही टमटमच आपली खरी लक्ष्मी असून, हिचे ऋण विसरू शकत नसल्याचेही साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फोटो
०६मगरधन साबळे-सरपंच