करमाळा : वीट (ता. करमाळा) येथे मारहाण करून जबरदस्तीने १ लाख ६ हजार रूपये लांबविले आहेत. हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता वीट गावाच्या माळावर घडला आहे. या घटनेचा गुन्हा रविवार २५ ऑक्टोबर रोजी दाखल झाला आहे. या प्रकरणी प्रताप महादेव धडस (रा.उंबरे दहिगाव, ता.माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी गेल्यावर्षी करमाळा येथे स्वतंत्र फायनान्समध्ये काम करत होतो. त्यावेळी फायनान्सचे कर्ज घेतलेले आक्काबाई यादव (काळे) व तिचा जावई महेंद्र पवार यांची ओळख होती. ५ ऑक्टोबर २०२० रोजी आक्काबाई यादव (काळे) यांचा फोन आला व आमच्याकडे सोने आहे, तुम्ही घेऊन जावा.. तुम्हाला स्वस्तात देते. त्या दिवशी मी दुपारी एक वाजता श्रीदेवीचामाळ येथे गेल्यावर आक्काबाई काळे हिने दीड ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग दिली व माझ्याकडून २१ हजार रूपये ॲडव्हान्स घेतले. त्यानंतर पाच तोळे सोने दीड लाखात द्यायचे ठरले होते. त्यानंतर मला फोन करून २१ ऑक्टोबरला बोलविले. तेव्हा मी सायंकाळी साडेपाच वाजता येतो म्हणाल्यानंतर मला त्यांनी करमाळा शहरात न बोलविता वीट गावाच्या माळावर बोलविले. तेथे गेल्यानंतर आक्काबाई यादव (काळे) तिचा नवरा यादव काळे, जावई महेंद्र पवार व इतर लोक होते.
त्यावेळी महेंद्र पवार याने पैसे आणले का.. असे विचारले. मी हो.. म्हटल्यावर तो पैसे द्या म्हणाला.. तेव्हा मी म्हणालो सोने दे.. तेव्हा त्याने चाकू दाखविला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून माझ्याजवळील १ लाख ६ हजार रूपये हिसकावून घेतले तसेच ड्रायव्हींग लायसन्सही घेतले व मला सदरच्या घटनेची फिर्याद दिल्यास तुला जीवे मारू अशी धमकी दिली. या लोकांनी माझी फसवणूक करून जबरदस्तीने १ लाख ६ हजार रूपये व २१ हजार रूपये ॲडव्हान्स अशी फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.