शिवानंद फुलारी
अक्कलकोट: प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. कोणाला गाण्याचा.. कोणाला वाद्यवृंदाचा असाच एक अवलिया स्वामी समर्थांच्या भूमीत आहे. त्याने आजवर २०० देशांतील ५० हजार देशी-विदेशी नोटा, नाणी अन् टपाल तिकिटांचा संग्रह केलाय. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने हा छंद जोपासला आहे. विजय शिंदे त्याचं नाव. एकूणच मैत्रीतून दुर्मिळ बाबी जोपासणाºया शिंदे यांना इंग्लंडच्या राणीची दाद वर्षानुवर्षे मिळते.
विजय शिंदे त्यांच्या घराजवळील मित्र कै. अरुण कुलकर्णी यांच्या दुपटी कारखान्यात कामाला होते. त्यांच्याकडे रद्दीतून विविध देशांचे जुने टपाल तिकीट येत असत. ती जमा करता करता त्याची संख्या हजारांमध्ये गेलीआहे. शिंदे याचे श्रेय त्यांच्या मित्राला देतात.आतापर्यंत प्रसिद्धीझोतापासून लांब आहेत. केवळ पोस्टाची तिकिटे, नाणी, नोटा न जमवता त्यांनी पूर्वी अक्कलकोट संस्थान असल्यामुळे अक्कलकोट संस्थानचे बडोदा, कुरुंदवाड, संस्थानचे त्यांच्याकडे कोर्ट फी, स्टॅम्पही संकलित केले आहेत. १९१४ पासून ते १९९९ पर्यंतचे पोस्टकार्ड्स त्यांच्याकडे आहेत. याबरोबरच काश्मीर, हैदराबाद संस्थानचे पोस्टकार्ड्स व पोस्ट तिकिटे आहेत. परदेशी तिकिटांशिवाय भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंदांपासून अलीकडच्या महात्मा गांधी यांच्या तिकिटांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
छंदातून मिळवली आठ ब्रांझ पदकेया छंदाच्या माध्यमातून शिंदे यांना ८ ब्रांझ पदके मिळाली आहेत. बंगळुरू, पुण्यासह विविध ठिकाणच्या ३५ प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्याकडे सध्या २०० देशांचे तिकीट, नाणी, टपाल, स्टॅम्प असा ५० हजार साठा आहे. याशिवाय देश-विदेशाच्या पाचशे नाणी, पाचच्या नोटांपासून ते पाचशेच्या सर्व नोटा उपलब्ध आहेत. राणी व्हिक्टोरियाच्या तिकिटापासून ते युवराज्ञी डायनाच्या तिकिटापर्यंतची सर्व तिकिटे त्यांच्याकडे आहेत. तसेच शिवकालीन, आदिलशाही काळातील दुर्मिळ नाणी आहेत. १८९८-१८९९ च्या दशकातील रशियाच्या नोटा आहेत. १९१४ पासूनचे भारतीय पोस्टकार्डसुद्धा उपलब्ध आहेत. शिंदे यांचे वय आता ५४ वर्षे आहे. पुण्याच्या सोशल सर्कल या संस्थेच्या माध्यमातून पत्रमैत्री झाली आणि पहिले तिकीट प्राप्त झाले.
छंदाच्या वेडातून लाभली पत्नीविजय शिंदे यांना पत्नीसुद्धा या छंदाच्या वेडातूनच लाभली आहे, हे विशेष. पत्नी नंदा, मुलगा अक्षय आणि मुलगी किरण या सर्वांनाच तिकिटे, नाणी संग्रहाचा छंद आहे. शिंदे यांनी आजवर इंग्लंडच्या राणीचा वाढदिवस असो किंवा नवीन वर्ष, काहीही असो. त्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे उत्तर येते. शिंदे यांनासुद्धा वाढदिवसाचे शुभेच्छा कार्ड्स येत असतात.
तिकिटे, नाणी, टपाल, स्टँप संकलनाचा छंद मला वयाच्या दहाव्या वर्षापासून लागला. माझा घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय सांभाळून हा छंद जोपासतोय. नव्या पिढीनेही अन्य अवैध छंद करण्यापेक्षा निर्व्यसनी राहून असे छंद बाळगावेत. सध्या माझ्याकडे असलेल्या विविध नाणी, तिकिटे, नोटांचा संग्रह ५० हजारांवर आहे तो लाखापर्यंत नेण्याचा संकल्प आहे. या संग्रहाचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी झाल्यास मला समाधान वाटेल. - विजय शिंदे, अक्कलकोट