टेंभुर्णी : माढा तालुक्यात चोरटे सक्रिय झाले आहेत. माढा न्यायालयामागे एका स्टॅम्प व्हेंडरच्या घरी मुलीच्या गळ्याभोवती चाकू लावत दागिने लुटल्याचे प्रकरण ताजे असताना टेंभुर्णी आणि वेणेगाव येथे चाेरट्यांनी दहशत माजवत सशस्त्र हल्ला चढवत या दोन ठिकाणांहून दागिने पळविल्याचा प्रकार पुढे आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री या दोन घटना घडल्या असून, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान टेंभुर्णी- कुर्डूवाडी रोडवर दूध डेरीच्या पाठीमागे नागनाथ काशिनाथ कुटे यांच्या घरात तीन चोरटे घुसले. त्यांनी दहशत माजवत लूटमारीला विरोध करणाऱ्या नागनाथ कुटे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर पत्नी सुवर्णा कुटे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. यानंतर या चोरट्यांनी त्याच रात्री स्वत:चा मोर्चा वेणेगावकडे वळवला. पुणे-सोलापूर महामार्गावर भारत पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राजेंद्र पठाडे यांच्या घरात ते घुसले. पत्नी मंगल पठाडे यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र काढून घेतले. एकाच रात्री चोरट्यांनी ६० हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याबाबत सुवर्णा नागनाथ कुटे यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी बार्शी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रेकर व साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुशील भोसले करीत आहेत.
----
फोटो : ०९ टेंभुर्णी