बार्शी : इंजिनिअरिंगच्या पदवीनंतर पुणे व मुंबई येथे खासगी कंपनीत चार वर्षे नोकरी केली. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे पहिल्यापासून स्वप्न होते. मात्र, काम आणि अभ्यास याचा मेळ बसत नव्हता. दरम्यान, नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली अन् खडतर प्रवास अनुभवत यश मिळविल्याची यशोगाथा उलगडली आहे जयजितसिंह याने.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत बार्शी तालुक्यातील तीन विद्यार्थी चमकले. त्यापैकी जयजितसिंह उमाप हा एक. पित्याचे छत्र हरपलेल्या उमापने निकालानंतर यशोगाथा उलगडली आहे.
काही वर्षांपासून बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आहेत. कालच्या निकालात तीन विद्यार्थी चमकले आहेत. त्यापैकी वडिलांचे छत्र हरपलेल्या जयजितसिंह उमाप याने जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणले आहे.
निखिल उमाप हा मूळचा बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (आ) येथील आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण काटेगावच्या महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यानंतर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. २०१३ ला कोथरूडच्या एमआयटीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर पुणे व मुंबई येथे खासगी कंपनीत चार वर्षे नोकरी केली. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे पहिल्यापासून स्वप्न होते. मात्र, काम आणि अभ्यास याचा मेळ बसत नव्हता. या दरम्यान नोकरीचा राजीनामा देऊन २०१७ ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या कालावधीत २०१९ ला केंद्रीय परीक्षेत गुप्तचर विभागात नोकरी लागली. ही नोकरी करत करत अभ्यास सुरू केला. तीन वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. मात्र, यशाने हुलकावणी दिली. मात्र, काहीही करून आपण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवायचे ही जिद्द कायम होती.
ऑक्टोबर २०२० ला पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. तो जानेवारी २०२१ ला मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. ऑगस्ट महिन्यात मुलाखत झाली. त्यावेळीही त्याचा आत्मविश्वास उत्तम होता. यश मिळणार याची खात्री होती. दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात हे यश मिळाल्याचे निखिल यांनी सांगितले.
---
कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली
जयजितसिंह उमापचे वडील जरिचंद उमाप हे समाजकल्याण विभागात अधिकारी होते. तसेच ते बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. आज ते हयात नाहीत. आई सुरेखा या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. त्याच्या दोन्ही बहिणी या इंजिनिअर आहेत. त्याचे कुटुंब त्याच्यासाठी प्रेरणा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.