सोलापूर: आजारपणात आईला रक्ताची गरज भासल्यावर रक्ताचे महत्त्व समजल्यावर त्याने रक्तदानाची चळवळ उभी केली अन् रक्तदाता दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जणांनी रक्तदान केले.
योगेश कांबळे (रा. स्वागतनगर, कुमठा नाका) असे त्या तरुणाचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची आई अंजनाबाई या आजारी पडल्या. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे आईला बाहेरून रक्त आणावे लागेल असा डॉक्टरांनी सल्ला दिल्यावर योगेश याचे टेन्शन वाढले. त्याने सिद्धेश्वर ब्लड बँकेशी संपर्क साधून रक्ताची निकड असल्याचे सांगितले. या ब्लड बँकेने त्याच्या आईला गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करून दिले. उपचारानंतर त्याची आई बरी झाली पण रक्ताचे महत्त्व त्याच्या डोक्यात भिनले. गरिबांसाठी आजारपणात रक्त कोठून मिळणार म्हणून त्याने पी. जी. ग्रुपच्या माध्यमातून तरुणांमध्ये रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली.
योगेशच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील २५ जणांनी मिळून गुरुवारी दुपारी ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. सागर शितोळे, सूरज नारायणकर, किरण गुद्दे, ओम जगताप, रोहन केंगनाळकर, मनोज भालेराव यांचा यामध्ये समावेश आहे. रक्त संकलन अधिकारी डॉ. दयानंद कोरे यांनी योगेशच्या चळवळीचे कौतुक केले. यावेळी डॉ. एस. बी. कांबळे यांनी त्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले. अपघात, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया, महिलांची प्रसूती व साथीच्या आजारात रक्ताची निकड भासते. अशावेळी रुग्णाच्या गटाचे रक्त उपलब्ध होणे अवघड असते. त्यामुळे तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आल्यास गरजू रुग्णांचे प्राण वाचले जातात. सर्व दानात रक्तदानाचे महत्त्व मोठे असल्याने ही चळवळ वाढीस लागणे गरजेचे असल्याचे सांगितले.
माझ्या आईला रक्ताची गरज भासल्यावर रक्तपेढीने रक्त उपलब्ध करून दिले. आई बरी झाल्यावर मी डॉक्टरांचे आभार मानायला गेल्यावर त्यांनी मला रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत मित्रांनी रक्तदान केले याचे मला समाधान वाटत आहे.
- योगेश कांबळे, रक्तदाता