अक्कलकोट : सांगवी कॉर्नर जवळ कारमधील लोकांनी टेम्पो अडवून चालकांच्या डोळ्यात चटणी टाकली. गळ्याला चाकू लावून रोख १२ हजार आणि मोबाईल सह २७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना ३ जुलै रोजी रात्री पावणेबारा वाजता घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन दोघांना अटक केली आणि ऐवज जप्त केला.
याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सिराज सैपन तांबोळी (रा. चुंगी ता.अक्कलकोट हल्ली कर्णिक नगर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी सिराज तांबोळी हे टेम्पो घेऊन सोलापूरहून कर्नाटकात कलबुर्गी येथे निघाले होते. सांगवी (ता.अक्कलकोट) येथील कॉर्नर जवळ येताच समोरून वागदरीहून एक कार (के. ए. ३२ डी. ६१७९) आली आणि कट मारुन पुढे गेली. काही क्षणात ही कार पुन्हा मागून पुढे आली आणि त्यातून पाच जण खाली उतरले आणि थेट टेम्पोमध्ये चढले. चालक तांबोळी यांच्या डोळ्यात चटणी टाकली. गळ्याला चाकू लावून रोख १२ हजार व १५ हजारांचा मोबाईल काढून घेऊन मारहाण करून पसार झाले.गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी शेजारील कर्नाटक सीमावर्ती भागातील सराईत गुन्हेगारांची यांचे यादी घेऊन त्यांनी तपास केला. आरोपी लक्ष्मण सिद्धप्पा गवंडी (रा. निलोरे, ता.जेऊरगी, गुलबर्गा), इमाम हुसेनसाब जमादार (रा. गुलबर्गा) या संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस नाईक महादेव चिंचोळकर, आसिफ शेख, प्रमोद शिंपाळे, गजानन गायकवाड, अशपाक मियावाले, चिदानंद उपाध्ये, अंबादास कोल्हे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला.
---
पथकाने बजावली कामगिरी
तपासासाठी दोन पोलीस पथके नेमली होती. एक पथक आळंद, गुलबर्गा, तर दुसरे पथक आलमेल, जेऊरगी येथे दाखल झाले. सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्याकडून सराईत गुन्हेगारांची यादी घेतली. १४ जुलै रोजी रात्री मैंदर्गी नाका येथे रात्रीच्या वेळी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत वाहन तपासणी सुरू केली असता आरोपी संशयितपणे वावरत होते. यावरून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
--
फोटो : १५ अक्कलकोट
टेम्पो चालकाला लुटणाऱ्या दोघा संशयितांना अक्कलकोट पोलिसांनी अटक केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड