सोलापूर : सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली आणि तिचा मिठीतला फोटो व्हायरल केला. या प्रकरणी एका तरुणावर सोमवारी (१ मे) रात्री गुन्हा नोंदला आहे. त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक छळ कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम लावण्यात आल्या आहे.
या प्रकरणी पिडित १५ वर्षाच्या मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सात-ते आठ महिन्यापूर्वी सोलापुरातील एका तरुणानं इन्स्टा अकौंटवरुन अल्पवयीन मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ती त्या मुलीनं स्वीकारली. सोबत त्यानं मोबाईल नंबर पाठवला. चॅटिंग करता करता एके दिवशी त्यानं मेसेस करुन एका ठिकाणी बोलावून घेतले. पुढे नेहमी भेटणे सुरु झाले. या भेटीत त्याने मिठीत घेतलेला फोटो काढला. काही दिवसांनी त्याने तो इन्स्टा स्टोरी बनवून माय क्लोज फ्रेंड ग्रूपवर शेअर केली.
सदरचा फोटो पिडितेचा मामा याच्या पाहण्यात आला. तो त्याने पिडितेच्या आईवडिलांना दाखवला. यातील पिडिता ही अनुसूचित जातीची तर मुलगा अन्य समाजाचा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं. वि. ३५४, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण व अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.