करमाळा : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मागील सरकारने आरक्षण दिले होते, पण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता येथून पुढे तरी सरकारने न्यायालयीन लढ्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत, अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करमाळ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, न्यायालयीन लढ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित बसून चांगल्या पद्धतीची तयारी करून वकिलांची फौज न्यायालयात उभी केली पाहिजे. आरक्षणाचे राजकारण होता कामा नये सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकत्रित बसून याचा अभ्यास करून न्यायालयीन लढाई लढली तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी असलो तरी मराठा समाजाचे आरक्षण अद्याप मिळत नाही.
आता मराठा समाजाचा संयम सुटत आलेला आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे. छत्रपती शाहू महाराजांना आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मांडणी केली, आता पत्रकारांनी छत्रपती शाहू महाराजांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वारंवार आपल्या लेखणीतून वाचकांपुढे नेला तर निश्चितच समाजात प्रगल्भता येऊन एकमेकांबद्दल प्रेम वाढेल, असे त्यांनी सांगितले.