सोलापूर : सोलापूर शहर आणि परिसरातील सायकली चोरून मिळतील तितक्या रकमेला विकणारा बालगुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडला आहे. त्याला वळसंग पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर अन्य दोन अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात संबंध असल्याचे उघडकीस आले.
श्रीमती लक्ष्मी मुकुंद अंकम ( रा विडी घरकूल, कुंभारी) यांनी त्यांची सायकल चोरीला गेल्याची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विडी घरकूल परिसरातील अल्पवयीन बालक अशा पद्धतीने सायकली चोरून तो विकत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विश्वासात घेतले असता आपल्या सोबत आणखी दोन मित्र या कामात मदत करीत असल्याचे त्याने सांगितले. ते दोघेही अल्पवयीन आहेत.
सोलापूर शहर आणि परिसरातील विविध कंपन्यांच्या ४३ सायकली चोरल्याचे या अल्पवयीन मुलाने कबूल केले. त्याची किंमत अडीच लाख रुपये आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भादवि कलम ३७९ प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले,पोसई अजय हंचाटे, पोलीस हवालदार श्रीनिवास दासरी,युनुस सय्यद,अभिजित रावडे,बाबुराव करपे,पोलीस नाईक मिलिंद पवार,विक्रम माने,नरेंद्र गायकवाड,गणेश पाटील,शहाजान शेख,रोहित थोरात,सुनील राठोड,वैभव सूर्यवंशी,विशाल मोरे यांनी तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली.
------
रेंजर सायकलींवर डोळा
महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना रेंजर सायकलची गरज असते अशी सायकल दिसताक्षणी विकली जात होती. त्यामुळे या अल्पवयीन मुलांचा डोळा रेंजर सायकलवर होता. या किमती सायकलींची विक्री अत्यल्प रकमेत केली जात होती. पाच हजार रुपयांची सायकल एक हजारांत विकण्याचा प्रकार तपासात दिसून आला.