Barshi Crime: बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजता घडली. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिस आरोपीला जोपर्यंत ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाइकांनी घेत संताप व्यक्त केला. अमोल अंगद आग्रे असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत मयताचा भाऊ संजय आग्रे यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी मयूर अनिल दराडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आळजापूरमधील ग्रामस्थ पारावर बसलेले असताना तेथे आरोपी त्याच्या मित्रासह आले. त्यावेळी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात आरोपीने फिर्यादी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ अमोल आग्रे याने त्या ठिकाणी येऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने रागाच्या भरात अमोल यास पाराच्या कठड्यावरून ढकलले. यात अमोल याच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर गंभीर दुखापत होऊन तो जागेवरच बेशुद्ध पडला.
दरम्यान, उपचारासाठी अमोलला उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे नेण्यात आले असता उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगण्यात आले.