सोलापूर : आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये बालक व गरोदर मातांच्या आरोग्याला अग्रक्रम देण्यात आला आहे. असे असताना बाळंतपणाच्या वेळेस सेवा देताना सरकारी नागरी दवाखान्यात अडचणी सांगून जबाबदारी टाळली जात असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात डिसेंबरअखेर ५९ हजार ९० गरोदर मातांची नोंदणी करून त्यांना आरोग्य सेवा देण्याचे उिद्दषष्ट देण्यात आले होते. यात ४२ हजार ३४२ मातांची नोंद झाली आहे. याशिवाय महानगरपालिका व नगरपालिकांची आकडेवारी वेगळी आहे. जिल्हा आरोग्यअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व अंगणवाडीमार्फत सर्वेक्षण करून माता-बाल संगोपन कार्यक्रम काटेकोरपणे राबविला जात आहे; पण नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत यंत्रणा तोकडी पडत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय गरोदर मातांच्या नियमित तपासण्या व प्रत्यक्ष बाळंतपणाच्या वेळेस वेगवेगळी कारणे सांगून सेवा देणे टाळले जात असल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण भागात गरिबीमुळे अनेकांना खायला सकस आहार मिळत नाही. त्यामुळे बहुतांश मातांमध्ये हिमग्लोबिनचे प्रमाण कमी, त्यामुळे अशक्तपणा व इतर आजारांची लक्षणे दिसून येतात. अशा जबाबदारींच्या सेवा टाळून शासकीय रुग्णालयाकडे बोट दाखविले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका व एक कर्मचारी सोबत देण्याची तरतूद असताना याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे अलीकडे झालेल्या तक्रारीवरून समोर आले आहे.
या आहेत सुविधा
गरोदर मातांचे सर्वेक्षण करून त्यांना अंगणवाडीमार्फत सकस आहार देण्याची तरतूद आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत पहिल्या गरोदरपणासाठी संबंधित मातेला आहार व औषधभत्ता म्हणून पाच हजार रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्क़म देण्याची तरतूद असून संबंधितांना याची माहिती दिली जात नाही.
१०२ रुग्णवाहिका मोफत
गरोदर मातेस घरी कळा सुरू झाल्या की संबंधितांनी घरून १०२ वर फोन केल्यास सरकारी रुग्णवाहिका तिला नेण्यासाठी घरी येईल. याशिवाय सरकारी रुग्णालयात अडचण असल्यास संबंधित डॉक्टराने या रुग्णवाहिकेमधून संबंधितास शासकीय रुग्णालयात दाखल करणे बंधनकारक आहे. मूल एक वर्षाचे होईपर्यंत घरी काही अडचण आल्यास फोन केल्यास रुग्णवाहिका घरी येते.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीणमधील गरोदर मातांचे वेळाेवेळी सर्वेक्षण करून त्यांना सुविधा दिल्या जातात. गरोदर मातांच्या सेवेसाठी १०२ व १०८ ची रुग्णवाहिका सेवा मोफत आहे. अशीच सुविधा नगरपालिका व महानगरपालिका हद्दीतील मातांना द्यावी, अशी तरतूद आहे.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी
तालुकानिहाय गरोदर माता
- पंढरपूर : ५१५८
- सांगोला : ४२६८
- मंगळवेढा : २६४६
- करमाळा : ३२५९
- माळशिरस : ६८८५
- द. सोलापूर : ३४३३
- माढा : ४२४५
- बार्शी : ३५११
- अक्कलकोट : ३७८३
- मोहोळ : ३७६२
- उ. सोलापूर : १३९२