माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. त्यामुळे येथील तालुका व शहरी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मात्र नागरिकांनीही याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना रुग्ण वाढत असताना नागरिक स्वतःची काळजी न घेता, विना मास्क बिनदास्त फिरत असल्याचे दिसून येत आहेत. येथील पोलीस अथवा नगरपालिकेच्या पथकाने याबाबत रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे. मात्र नागरिक त्यांच्याजवळ येईपर्यंत मास्क वापरत नाहीत. पथक दिसताच खिश्यातील मास्क काढून तोंडावर लावत त्यांच्यासमोरून निघून जात असल्याचे दिसून येत आहेत. परिणामी गेल्या १५ दिवसांत कोरोना बाधित रुग्ण संख्येने शंभरी पार केल्याचा आकडा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचा अहवाल पाहता कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये टेंभुर्णी, निमगाव (टे), उपळाई ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत. सध्या तालुक्यात १० रुग्ण हे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून उर्वरित सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात सेवा घेत आहेत.
कोट :::::::::
माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास स्वतःहून तपासणी करून घ्यावी. तसेच आरोग्य विभागाही सहकार्य करावे. सध्या लसीकरण सुरू असून त्याचाही लाभ घ्यावा.
- डॉ. शिवाजी थोरात,
तालुका आरोग्य अधिकारी