संतोष आचलारे
सोलापूर : टंचाई परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील तहानलेल्या गावांना सोलापुरातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गुरुद्वार येथे असणाºया दोन खासगी बोअरवेलमधून रोज सुमारे ५० ते ६० टँकर पाणी तहानलेल्या गावांना येथून जात आहे. टँकरमधून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी जाणारे हे पाणी शुद्ध आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. यावेळी पाणी तपासणीदरम्यान पाण्याचा कलर पिवळा दिसला तरच टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात येत आहे.
टँकरने पाणीपुरवठा करणाºया गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार टँकरमध्ये पाणी भरण्याच्या ठिकाणी पाण्याची शुद्धता तपासण्यात येत आहे. क्लोरोस्कोप या प्रायोगिक उपकरणातून पाण्याचे शुद्धीकरण तपासण्यात येते. टँकरमधून या उपकरणात पाणी घेण्यात येते, त्यात या पाण्याचा रंग पिवळा दिसला तरच पाणी शुद्ध आहे, असा शास्त्रीय निष्कर्ष काढण्यात येतो. पिवळा रंग दिसून आलेल्या टँकरमधील पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येतात.
गुरुद्वार येथे भरण्यात येणाºया टँकरमध्ये अर्धे पाणी भरल्यानंतर त्यात आरोग्य खात्याच्या टीमकडून मेडिक्लोअर मिसळण्यात येते. टँकर पूर्ण भरल्यानंतर ते संपूर्ण पाण्यात मिसळते. टँकर भरल्यानंतर पुन्हा एकदा टँकरमधील पाणी क्लोरोस्कोपने तपासण्यात येते. जर या उपकरणात पाण्याचा रंग मूळ दाखविला तर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. असे पाणी शुद्ध केल्यानंतरच ते पुढे पाठविण्यात येते.
दक्षिण सोलापूर तालुक्यात या ठिकाणाहून रोज ४० ते ४२ टँकर भरून जात आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांसाठी रोज २० ते २५ टँकर या ठिकाणावरून भरून जात आहेत. जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डी. व्ही. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरोग्य खात्याची टीम पाणी तपासणीसाठी तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विस्तार अधिकारी बी. के. चव्हाण, आरोग्य सहायक ए. एस. बिराजदार, सी. एस. धत्तरगी आदी कर्मचारी शुद्ध पाण्याची खात्री या ठिकाणी करीत आहेत.
२४ तास पाण्याची शुद्धता तपासणीगुरुद्वार येथील खासगी बोअरवेलमधून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी जात आहे. हे पाणी पिण्यास योग्य असावे, यासाठी याठिकाणी आरोग्य खात्याची टीम २४ तास तैनात ठेवण्यात आली आहे. रात्री-बेरात्रीही टँकर भरताना पाणी शुद्ध करूनच ते पुढे गावात पाठविण्याचे काम या ठिकाणी होत आहे. यासाठी दोन सत्रात टीम तैनात करण्यात आली आहे.
एकदा शुद्ध केलेले पाणी आठ तास शुद्ध राहते- बोअरचे पाणी टँकरमध्ये भरल्यानंतर ते पाणी पिण्यास योग्य ठरावे, यासाठी आरोग्य खात्याकडून १२ हजार लिटर पाण्याच्या टँकरमध्ये तीन बाटली मेडिक्लोअर मिसळण्यात येते. त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य ठरते. या पाण्याची शुद्धता किमान आठ तासांपर्यंत टिकून राहते, अशी माहिती यावेळी आरोग्य खात्यातील टीमने दिली.