सोलापूर : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी रात्री गरोदर महिलेचे शवविच्छेदन करता येत नाही, असा नियम आरोग्य मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून काँग्रेस नगरसेवकाच्या विनंतीवरून परस्पर शवविच्छेदन उरकल्याने आता राजकारण रंगले आहे.
जयश्री हाक्के (वय ३२, रा. घोंगडे वस्ती) यांचा स्वाईन फ्लूने उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सायंकाळी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला, पण तोवर शवविच्छेदन विभाग बंद झाला होता व संबंधित डॉक्टर निवासस्थानी परतले होते. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते राजकुमार पाटील यांनी शवविच्छेदन होण्यासाठी संबंधित डॉक्टरांना संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी अधिष्ठात्यांशी संपर्क साधल्यावर मृत महिला गरोदर असल्याने रात्री शवविच्छेदन करता येणार नाही, असा नियम सांगण्यात आला. पण मृत महिलेच्या नातेवाईकांचा आग्रह असल्यामुळे पाटील यांनी ही बाब आरोग्य तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निदर्शनाला आणली. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी नियमाने सकाळी शवविच्छेदन करणे सोयीचे होईल, असा सल्ला दिला. त्यामुळे पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते रुग्णालयातून परतले.
पण मृताचे नातेवाईक इतक्या प्रयत्नावरच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्याशी संपर्क साधला. मिस्त्री हे गेल्या अनेक वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांची सेवा करतात. त्यामुळे संंबंधित डॉक्टरांशी ते परिचित आहेत. ते तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले व शवविच्छेदन विभागातील संबंधित डॉक्टरांना विनंती केल्यावर ते तेथे आले व रात्री साडेनऊ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. जाताना संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. मंत्री असून तुमचा उपयोग काय? तुम्ही नियम सांगितलात, पण रात्रीच शवविच्छेदन कसे झाले. या सवालाने पालकमंत्री गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले.