सोलापूर : राज्यातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य विभागात क व ड संवर्गातील ११ हजार पदे भरण्यात येत असून १ हजार ७५० डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालय याठिकाणी पुर्णक्षमतेने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलेसीस सेंटरची उभारणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील आयुष्यामान आरोग्य मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली, सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकात पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पुढे बोलताना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना स्थानिक पातळीवर आवश्यक आरोग्य सेवासुविधा मिळाव्यात, प्रत्येकाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी. आरोग्य केंद्राच्याबाबतीत कोणाचीही तक्रार येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. नागरिकांना आरोग्य केंद्रात तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील साधन सामुग्रीचा वापर व्हावा असे सांगितले. आयुषमान भारत योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत उपचार सुविधा मिळू शकतात. आरोग्यावर होणारा खर्च उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देण्याची गरज नाही. यासाठी प्रत्येक कुटुंबाने आयुष्यमान कार्ड काढावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.