तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, विस्तार अधिकारी पोतदार व आरोग्यसेवक गोंडरे हे येथील तालुकास्तरावरील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी असून, सध्याच्या परिस्थितीत कोविड-१९ चे काम करीत असताना कोणाच्या तरी संपर्कात येऊन स्वतःच कोरोनाबाधित आढळून आले. स्वतःच्या काळजीबरोबरच आपल्यावर तालुक्यातील अवलंबून असणाऱ्या अनेक रुग्णांना दिलासा देण्यासाठी ते धडपडत असल्याचे दिसून येत आहे.
माढा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या तालुका कार्यालयावर सध्या वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोखण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी २४ तास आपल्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. अशातच येथील तालुका अधिकारी व इतर दोन कर्मचारी हे कोरोनाबाधित आढळले. मात्र, ते खचले नाहीत. आपली योग्य काळजी घेत दररोजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना देण्याचे काम ते अगदी न थकता करीत आहेत.
---
घरी सहवासामुळे मुलंही बाधित
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. थोरात व विस्तार अधिकारी पोतदार यांच्या घरच्या सहवासामुळे त्यांच्या घरी त्यांचे एकेक मुलेही कोरोनाबाधित झाली आहेत. त्यांचीही काळजी ते यादरम्यानच घेत आहेत.
...................