माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाने डोके वर काढले असून, शनिवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण तालुक्यातील आकडेवारी पाहता तब्बल ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याला थोपविण्यासाठी तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यातच टेंभुर्णी व निमगाव (टे) ही गावे हॉटस्पॉट बनत चालली आहेत. तसेच लोकांकडून लसीकरणासाठी उदासीनता दाखवली जात आहे. यासाठी सहभाग वाढायला हवा, असा सूर वैद्यकीय यंत्रणेकडून व्यक्त होऊ लागला आहे.
प्रशासन कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काळजी घेत आहे. पण दुसऱ्या टप्प्यात नागरिकांतून म्हणावा तसा प्रतिसाद येथील यंत्रणेला मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या काळात येथील वयोवृद्ध व शासनाने ठरवून दिलेल्या पात्रतेतील नागरिकांना व शासकीय प्रणालीतील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देण्यात येणारे लसीकरण कमी प्रमाणात झालेले दिसत आहे. त्याला येथील लाभार्थीमधूनच पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच गंभीरपणे सर्वसामान्य नागरिकांनी विचार करणे गरजेचे बनले आहे.
माढा तालुक्यातील सर्व शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी वर्गातून व सर्वसामान्य लाभार्थी नागरिकांतून कोविड बाबत आतापर्यंत एकूण २,७८६ जनांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये फक्त ६० वर्षांच्या पुढील फक्त ४१ वयोवृद्धांनी सहभाग नोंदवला आहे. बाकीच्यानी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर ४८४ खाजगी व्यक्तीनेही यात लसीकरण करून घेतले आहे. लसीकरणाची संख्या पाहता तालुक्याच्या लोकसंख्याचा विचार करता हे प्रमाण खूप कमी आहे. यामुळे नागरिकांनीही दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लढाईत स्वतःहून सहभागी होऊन त्याला हद्दपार करावे लागणार आहे, असा सूर आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्ध्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे.
---
माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाने डोके वर काढले आहे. त्याला थोपविण्यासाठी आमची सर्व टीम काम करीत आहे. यात नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. तालुक्यातील कोविड लसीकरणासंबंधी सर्वांनीच लस वेळेत घेतली पाहिजे. तरच आपणाला त्याविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढणार आहे.
- डॉ शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
----