मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांच्या तुलनेत ५,२५५ मतदार वाढलेले दिसत आहेत. हे मतदार कमी व्हावेत म्हणून माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, अशोक गायकवाड, नागेश क्षीरसागर, सतीश बनसोडे, गौतम क्षीरसागर, दीपक तांबवे, सागर गाढवे, राजू रसाळ, विशाल रसाळ, सिद्धार्थ एकमले, अतुल क्षीरसागर, सागर अष्टूळ, सोमनाथ क्षीरसागर यांनी तक्रार देऊन हरकती नोंदवल्या होत्या. त्यानुसार ही सुनावणी सुरू आहे. ११ मार्च रोजी तहसीलदार जीवन बनसोडे, निवडणूक शाखाधिकारी राजशेखर लिंबारे, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक, महेंद्र नवले यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली.
प्रारंभी, ११ मार्च रोजी सुमारे ४२९ नावांवर घेण्यात आलेल्या हरकतीमध्ये ४१ मतदारांनी उपस्थित राहून पुराव्यासह माहिती दिली होती, तर ३८८ मतदार गैरहजर होते. १७ मार्च रोजी दुसरी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये १०५ नावांवर हरकत नोंदविली होती. यावेळी केवळ १० मतदारांनी उपस्थित राहून आपले पुरावे दाखवले.
दरम्यान, आता दोन्ही सुनावणींदरम्यान गैरहजर राहिलेल्या ४८३ मतदारांच्या त्यांनी दिलेल्या पत्त्यावर निवडणूक यंत्रणेद्वारे सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर
पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.