सोलापूर : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला साथ कोणी देईल की नाही याची चिंता जन्मभर सतावते आणि शेवटच्या टप्प्यात स्वकीयांनी लांब केल्यानंतर माणसाची जी अवस्था होते ती नरकाहून वेगळी नसते. कौटुंबिक नरक अनुभवलेल्या वृद्ध महिला येथील एका आश्रमात एकमेकींच्या सहृदयी बनत वृद्धाश्रमाचा स्वर्ग केला. हाच स्वर्ग आता सोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांचा प्रेरणास्रोत बनला आहे.
येथील मंगलदृष्टी वृद्धाश्रमात भेटी देणाºया सामाजिक संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, विवाह दिन तसेच इतर जयंती दिवशी विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल आश्रमात चालते. एक आॅक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन आहे. डफरीन चौकनजीक बीसी गर्ल्स हॉस्टेलच्या जुन्या इमारतीत मंगलदृष्टी वृद्धाश्रम आहे. सध्या या आश्रमात बारा वृद्ध महिला आहेत. विविध ठिकाणांहून आलेल्या वृद्ध महिला अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आपुलकीने एकमेकांची काळजी घेतात.
आश्रमकडून या सर्व महिलांची काळजी घेतली जाते. रोज दोन वेळचं जेवण आणि सकाळी नाष्टा दिला जातो. यासोबत आरोग्याची काळजी घेतली जाते. आजारी महिलांची तपासणी वारंवार होते. या कामात आश्रमाचे प्रमुख सतीश मालू, माजी नगरसेविका चंद्रिका चौहान व रोटरी क्लब तसेच रोटी बँकेकडून भरपूर सहकार्य मिळते.
दवाखान्यात असतानाही मुलं आली नाहीतआश्रमाच्या व्यवस्थापिका रजनी भाटिया सांगतात, एक आजी खूप सिरीयस होती. तिला दवाखान्यात अॅडमिट केलं. तिच्या मुलांना आणि नातेवाईकांना ती भेटू इच्छित होती. याची कल्पना तिच्या नातेवाईकांना दिली. अनेकदा फोन करून भेटायला येण्याची विनंती केली. तिच्या नातेवाईकांनी तिला नाकारलं. पुन्हा फोन करू नका, असंही धमकावलं. त्यामुळे त्या आजीची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली. पण, तिला तिच्या शेवटच्या काळात आश्रममधील महिलांनीच जपलं, प्रेम दिलं. आपुलकीनं वागविलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आश्रममधीलच महिला एकमेकींच्या सहृदयी बनतात. यातूनच स्वर्ग निर्माण झाल्याचा आनंद सर्वांना मिळतो.