सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे दगावली आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील ४ हजार ७३१ कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा तसेच साखर कारखान्यांचा आसरा घेतला आहे. १६ हजार ९५४ नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील महापुराची भीषणता लक्षात येईल.
जिल्ह्यातील १७९ ठिकाणी वाहतूक सुविधांवर परिणाम झाला आहे. तसेच १३३८ घरांची पडझड झाली असून दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली आहे.
बुधवारी १४ ऑक्टोंबर रात्रभर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली बाधित गाव पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.रबर रेस्क्यू बोटद्वारे महापुरात अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. याकरिता एनडीआरएफचे जवान तसेच महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.