भीमानगर : भीमा खोऱ्यात शुक्रवारी दिवसरात्र पावसाने थैमान घातले आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दौंडमधून अजूनही ६९,३३९ हजार क्यूसेकने विसर्ग उजनीत येत असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी २० टक्के साठा झाला. हा पाऊस असाच सुरू राहिला तर लवकरच उजनी भरेल, असा आशावाद शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे.
खडकवासला धरण ९८ टक्के भरले असल्याने या धरणातून १९ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रचंड मोठा विसर्ग असल्याने उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढली. शनिवारी ६९,३३९ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग पोहोचला आहे. अजूनही उजनीत ६९,३३९ क्यूसेकने पाणी येतच आहे.
कासारसाई २२००, वडिवळे ६४००, कळमोडी ३३००, आंध्रा ३३०० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.
गेल्या २४ तासांत मुळशीवर २००, पवना १२५, टेमघर २००, वडिवळे १९०, पानशेत २००, वरसगाव १९०, आंध्रा १००, कळमोडी १२५, भामा-आसखेड १९०, खडकवासला ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कळमोडी, आंध्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला ९८ तर कासारसाई ९०, वडिवळे ९०, पवना ७५, पानशेत ७८ टक्के, वरसगाव ७०, भामा ७५, मुळशी ६२ टक्के भरली आहेत. येणाऱ्या काळात भीमा खोऱ्यातील पडलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाला होणार आहे. उजनी धरण याही वर्षी शंभर टक्के भरणार, अशी आशा सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
-----
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणीपातळी ४९२.३८० मीटर,
एकूण पाणीसाठा ७३.६९ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा १०.२ टीएमसी, टक्केवारी २० टक्के,
उजनीत येणारा विसर्ग
बंडगार्डन २१,२७७ क्यूसेक
दौंड ६९,३३९ क्यूसेक.
----
.. तर वर्षभराची चिंता मिटेल
उजनी धरणावर जिल्ह्यातील शेतीबरोबरच अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. भीमा खोऱ्यातील पाऊस आणि मुळा, मुठा, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे उजनी धरण लवकरच भरेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातून व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे वर्षभर पाण्याची चिंता मिटेल, अशी चर्चा व्यक्त होऊ लागली आहे.