आप्पासाहेब पाटील, सोलापूर : अक्कलकोट शहर व परिसरात गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. विजेचा कडकडाट अन् वादळी वारे वाहत असल्यामुळे पावसाचा जोर जरा जास्तच होता. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे बाजारपेठेत चांगलीच धांदल उडाली.
दरम्यान, गुरूवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता जास्त जाणवत होती. उकाडाही वाढला होता. त्यामुळे पावसाचा अंदाज सकाळपासूनच वर्तविण्यात येत होता. सायंकाळी चारनंतर हवामानात बदल दिसून आला. आभाळ भरण्यास सुरूवात झाली. वारे जोरात वाहू लागले. पावसाचे आगमन थोड्याच वेळात आगमन होणार होणार असे म्हणत असतानाच अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. साडेचार वाजण्याच्या सुुमारास सुरू झालेला पाऊस सव्वा पाच वाजेपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे दिवसभर उकाडा सहन केलेल्या लोकांना दिलासा मिळाला.
सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. गुरूवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. वाढत्या तापमानाबरोबरच उकाडाही वाढत असल्याने अवकाळी पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. आणखीन काही दिवस अवकाळी पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून आणखीन दोन ते तीन दिवस तापमानात मोठया प्रमाणात वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले.