आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात सर्वत्र गुरूवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याकडे या पावसाची नोंद ३७.४ मिलिमीटर इतकी झाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील पूलावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे गुरूवारी पहाटेपासून कासेगांवचा शहराशी संपर्क खंडीत झाला. गुरूवारी मध्यरात्रीपासून पहाटे दरम्यान विजांच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रानातून पाणी वाहू लागल्याने गांव ओढ्याला यंदाचा पहिला-वहिला पूर आला. ओढा दुथडी भरून वाहू लागला. ते पाणी पूलावरून वाहू लागल्याने संपर्क खंडीत झाला.
याशिवाय बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सांगोला, मोहोळ आदी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील विजापूर रोड परिसरातील झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे. तर अनेक शाळांच्या परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. या पावसामुळे विद्युत पुरवठाही काही भागात खंडीत झाला असून सकाळी ८ च्या सुमारास काही भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याचे महावितरणने सांगितले.