सोलापूर : मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोलापूर शहर व परिसरात बुधवारी रात्रभर जोरदार हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत म्हणजेच मागील २४ तासात सोलापुरात २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, काल बुधवार गणेशोत्सवाच्या आगमनाचा दिवस होता. दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत होता. सायंकाळी सातच्या सुमारास आभाळ गच्च भरले होते. साडेसातच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. कमी जास्त अशा प्रमाणात पाऊस पडत असतानाच सायंकाळी आठनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. रात्रभर पडलेल्या पावसाने गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास विश्रांती घेतली. त्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास सुर्यदर्शन झाले.
रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. शिवाय ग्रामीण भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. काल सायंकाळीच हवामान खात्याने विजांसह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार सोलापूर शहरासोबतच परिसरातील काही गावात जोरदार पावसाने हजेरी लावली.