सोलापूरमध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळं नागरिकांसह बाजारपेठेतील छोट्या छोट्या व्यापार्यांची मोठी तारांबळ झाली. जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक घरात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती लोकमत ला मिळाली. याशिवाय सखल भागात साचलेल्या पाण्यातून गाडी चालविताना इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्याने लोक गाडी ढकलत घर गाठत असल्याचे चित्र लोकमत च्या पाहणीत दिसून आले.
सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला शहराच्या बाहेर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने चांगलाच जोर धरला. थोडी थोडी विश्रांती घेत पावसाने चांगलीच हजेरी लावली. अनेक भागात पाणी साचले. काही भागातील छोटी छोटी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या २४ तासात ४४.४.मि.मी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील मोदी, तुराट गल्ली, विजापूर नाका, मराठा वस्ती, कोनापुरे चाळ, घोंगडे वस्ती, वाडीया हॉस्पीटल परिसर, हुंडेकरी प्लॉट, हरिभाई शाळेच्या मागे, शेळगी, विजापूर वेस, झोपडपट्टी नंबर २, सत्तर फुट रोड, शास्त्री नगर, कुमठे, मोदी, आण्णाभाऊ साठे नगर, निराळे वस्ती, मडकी वस्ती, शिवाजीनगर, दहिटणे, विडी घरकुल, निलम नगर आदी भागातील अनेक घरात पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती लोकमत ला मिळाली.