सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने सोलापूरकरांची धाकधूक वाढली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुण्यात व उजनी धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे दौंडमधून धरणात ५००५ हजार क्युसेकने पाणी येत आहे. सध्या उजनी धरणात २१.६८ टक्के पाणीसाठा आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांना चिंता लागली होती. चांगला पाऊस न पडल्याने शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील सात दिवसात कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचबरोबरच पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून उजनी धरणात दौंडमधून पाणी येत आहे. सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे.
अशा परिस्थितीत भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती आली होती. भीमा नदीवरील सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहरासह इतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनासाठी १९ सप्टेंबर २०२३ पासून उजनी धरणातून ४.५ टीएमसी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आले आहे.