सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मंगळवारी गारांचा पाऊस पडला. गावात कोरोनाचे बालंट, शेतात दररोज वादळी वारे अन् वीज- पावसाचे संकट, त्यातच संचारबंदीच्या दहशतीने शेतीमाल व दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या सर्व बाजूंनी पंचायत झाली आहे. काय करावे अन् कसे दिवस काढावे, असे चित्र गावागावात दिसू लागले आहे.
सोलापूर शहरासह मंगळवेढा, मोहोळ तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतात सुरू असलेल्या कामांच्या मजुरांची धांदल उडाली. सोलापूर शहरात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची घरी जाण्याची लगबग सुरू असतानाच पावसाने त्यांना गाठले.
सोमवारी रात्री झालेला वादळी वारा व पावसाने पंढरपूर तालुक्यातील करकंब, बार्डी आणि जाधववाडी येथील काढणीला आलेल्या बेदाणा शेडवरील प्लास्टिक कागद व शेडनेट फाटून बेदाणा भिजून चिखल झाला. काहींच्या घरावरील पत्रे उडाले. तर भोसे येथील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. करकंबसह बार्डी आणि जाधववाडी येथील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. भोसे येथील काही शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे.
मागील वर्षीपासून देशावर असलेले कोरोनाच्या संकटाने शेतीत पिकविलेले द्राक्ष, केळी, भाजीपाला आदींसह विविध प्रकारचा शेतीमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. असे असतानाच या परिसरातील ४० टक्के द्राक्ष बागांना फळच आले नाही.
गावात कोरोनाची भीती वाढत असताना आठवडाभरापासून दररोज वादळी वारे व विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष जागेवर आहेत, त्यांना धडकी भरू लागली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. ज्वारी, गहू काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने मागेल तेवढे पैसे किंवा ज्वारी द्यावी लागत आहे. यातच पावसाचे थेंब पडल्याने कडबा काळा पडू लागला आहे. कांदा, वांगी, टोमॅटोला व अन्य शेतीमालाला
भाव नसल्याने केलेला खर्चही निघेना झाला आहे.