सोलापूर : मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहरातील वातावरणात सातत्याने बदल दिसून येत होता. आज शनिवारी दुपारनंतर आकाशात अचानक ढग दाटून आले अन् सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. अचानक सुरू झालेल्या पावसानं सोलापूरसह ग्रामीण भागातील अनेक गावांना चांगलेच झोडपले.
दरम्यान, सोलापूर शहराच्या तापमानात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली होती. वाढत जात असलेल्या तापमानात अचानक पावसाने हजेरी लावल्यानं वातावरणात मोठा बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून सोलापुरात पाऊस चांगलाच पडत आहे. शनिवारी दुपारी काही भागात तर सायंकाळी साडेपाच वाजता पावसाने हजेरी लावली. शहरातील आसरा चौक, जुळे सोलापूर, होटगी रोड, सात रस्ता आदी परिसरात चांगला पाऊस पडला. दुपारपासूनच ढग आणि उन्हाचा खेळ रंगला होता. संध्याकाळी सहानंतर पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, साडेपाचनंतर पावसाला सुरुवात झाली. २० ते २५ मिनिटांपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे तापमानात घट झाली. शनिवारी सोलापूरचे तापमान कमाल ३७.७ अंश सेल्सिअर तर किमान तापमान २४.४ सेल्सिअस असे नोंदले आहे. २४ तासात सोलापुरात २.२ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.