सोलापूर : शहरातील प्रमुख आठ मध्यवर्ती मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुका व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनादिवशी नागरिकांची शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मिरवणुकीस सार्वजनिक वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ विसर्जनादिवशी शहरातील वाहतूक मार्गात बदल केला असून, महत्त्वाचे रस्ते बंद करण्याचा निर्णय सोलापूर शहर पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढले आहेत. त्यानुसार विजापूरहून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाक्यावरून नवीन बायपासमार्गे देगाववरून पुढे जाता येणार आहे. पुण्याकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पुना नाका येथून बायपासमार्गे पुढे जाता येईल. हैदराबादहून पुणे किंवा विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, नवीन पुना नाका, नवीन केगाव बायपासमार्गे प्रवास करता येईल. रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्डकडे ये-जा करण्यासाठी विजापूर नाका, आयटीआय पोलिस चौकी, निर्मिती विहार, सलगर वस्ती पोलिस ठाणे, मरिआई चौक, भय्या चौक, रेल्वे स्टेशन, भय्या चौक ते निराळे वस्तीमार्गे एसटी स्टॅण्ड असे जाता येईल, तसेच जुळे सोलापूरहून शहरात येणाऱ्या वाहनांना जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे प्रवास करता येणार आहे.