सांगोला शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही अत्यवस्थ रुग्ण शहरासह पंढरपूर, सोलापूर, सांगली, मिरज, अकलूज येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक गत आठ दिवसांपासून उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावाधाव करताना दिसत आहेत. मात्र, रुग्णालयात जागा नसल्याने अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करताना ऑक्सिजनची सुविधा द्यावी लागत आहे. मात्र, प्रचंड मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन रुग्णालयात पोहोचले की, नातेवाईकांची गर्दी होत आहे. शहरातील खासगी अतिदक्षता विभागात सुद्धा कोरोनाच्या काही गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडसाठी दमछाक होत आहे. सांगोला शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये शहरासह तालुक्यातील तसेच मंगळवेढा, जत, आटपाडी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने सध्या कोठेही बेड शिल्लक नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
आरोग्य प्रशासनावर ताण
वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य प्रशासनावर येत असून, मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यांना उपचारासह ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना सध्या बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर गेलेला रुग्ण बरा होण्यास अधिक कालावधी लागत असल्याने बेडची कमतरता भासत आहे.
५०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
सांगोला शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेकांना बेडअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधितांना उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येत आहे. मात्र गोरगरीब, मजूर, कामगारांना उपचारासाठी इतका खर्च कसा करायचा याची चिंता लागली आहे. याचाच विचार करून ग्रामीण रुग्णालयात ५०० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.