सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बिनधास्त आणि निडर स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. एखाद्याच्या चुकीला ते रागावयाल जसं मागेपुढे पाहात नाहीत, तसंच एखाद्याचं कौतुक करायलाही ते कमीपणा मानत नाहीत. त्यामुळेच, अजित पवारांनीसोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील एका चित्रकाराचं फोन करुन कौतुक केलंय. बार्शी तालुक्यातील जामगाव येथे राहणाऱ्या तरुण महेश मस्केला दादांनी फोन आला. नमस्कार, मी अजित पवार बोलतोय. हे शब्द ऐकल्यावर महेशला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. महेशने पिंपळाच्या पानावर अजित पवारांचे चित्र रेखाटले होते. त्याबद्दल अजित पवारांनी कौतुकपर अभिनंदन केल्यावर महेशला विश्वास बसला.
लॉकडाऊन असल्याने पेन्सिल चित्रासाठी लागणारे साहित्य आपल्याकडे नाही. त्यामुळे, पिंपळाच्या पानावर व्यक्तीचित्रण करण्याची कला त्याने जोपासली आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला कामही नाही आणि घरातून बाहेरही पडायचं नाही. त्यामुळे, महेशने पिंपळाच्या पानावरच चित्रे रेखाटायला सुरुवात केली. अनेक दिग्गजांची चित्रे त्याने पिंपळाच्या पानावर रेखाटली आहेत. विशेष म्हणजे अभिनेता सोनू सूदचेही चित्र त्याने पिंपळाच्या पानावर रेखाटले. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेही चित्र त्याने पिंपळाच्या पानावर रेखाटले आहे.
अजित पवारांचे असेच एक चित्र रेखाटून त्याने बारामतीला पाठविले होते. हे चित्र पाहून अजित पवारांनी महेशला फोन केला. सुरुवातीला महेशला विश्वास बसला नाही. फोन नंबर पाहिल्यावर तो मुंबईतील लँडलाईवरून आला होता. अजित पवारांचा आवाज ओळखत असल्यामुळे त्याची खात्री पटली.
यापूर्वी महेश मस्के यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे चित्र रेखाटले होते. बारामतीच्या एका परिचिताकडून महेशला अजित पवार यांच्या घरचा नंबर मिळाला. महेश मस्के यांनी सुनेत्रा पवार यांचे चित्र काढून पाठवले होते. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी महेशचे कौतुक करून त्याचा फोन नंबर सेव्ह केला होता. त्यानंतर महेशने अजित पवारांचे चित्र काढून सुनेत्रा पवार यांना पाठवले. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना चित्र दाखवले. त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अजित दादांनी महेशला फोन करुन त्यांच्या चित्रकेलंच कौतुक केलं. तसेच, कोरोना महामारीचं संकट कमी झाल्यानंतर आपण भेटू, असेही आश्वासन दिलं.
फोन आल्यानंतर असा झाला संवाद...
अजित पवार : मस्के, नमस्कार, मी अजित पवार बोलतोय... तुम्ही चित्रकार आहात ना !
महेश मस्को : हो...अजित पवार : वडाच्या पानावर तुम्ही रेखाटलेले व्यक्तिचित्र मिळाले. तुम्ही सांगितले होते, दादांना दाखवा, ते मी पाहिलं. अतिशय सुंदर काढलेले आहे. तुमचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. तुम्ही दिव्यांग असतानाही त्यावर मात करून कला जोपासताय. तुमच्या अंगात कला आहे. ती कौतुकास्पद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आपण भेटू. वडाच्या पानावर इतकं सुंदर चित्र काढलं गेलेलं पाहून मी आश्चर्यचकीत झालो.महेश मस्के : एकदा आपली भेट वैरागमध्ये झाली होती. मॅडमचे पण चित्र दिले होते.अजित पवार : हो, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. काळजी घ्या...