एल.डी. वाघमोडे
माळशिरस : हॅलो... हॅलो... माऊली गावाकडं पाऊस हाय का़.. असं विचारत भक्तीच्या वाटेवर असलेल्या एका दाम्पत्याला गावाकडची आठवण झाली़ पण पोटच्या पोराला नावानं हाक न मारता ‘माऊली’ म्हणाले़ कारण माऊलीच्या पालखीसोबत राहून सर्वांना माऊलीच म्हणण्याची सवय जडल्याचे दिसून आले.
भक्तीच्या वाटेने तल्लीन झालेल्या शेतकºयाला पालखी मुक्काम परिसरात विसावल्यानंतर आपल्या गावाकडची आठवण झाली़ पालखी सोहळ्यात मराठवाडा, विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात़ या भागात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड पावसाच्याच भरवशावर केली जाते. गेल्या काही वर्षांपासून अपुºया पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पालखी सोहळ्यात असलेल्या नाना गुनाजी भालेराव व त्यांची पत्नी सखुबाई (रा.चौआबे, ता किल्ले धारूर, जि. बीड) येथील वारकºयाला पावसाची ख्यालीखुशाली विचारण्याशिवाय राहावलं नाही.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरस नगरीत दाखल झाली़ माऊलीच्या भक्तीने तल्लीन होऊन पायी वारी करत असतानाच दुपारी विसावल्यानंतर गावाकडची आठवण झाली़ लगेच खिशातला फोन काढून त्यांनी आपल्या कुटुंबाची ख्यालीखुशाली विचारत बोलण्यात मग्न झाले.
पालखी माळशिरस मुक्कामी येत असताना सलग ११ वर्षे माऊलीची वारी करणारे भालेराव दांपत्य दुपारी मांडवे येथे जेवण करून विसावा घेताना आपला मुलगा त्र्यंबक (बाबू) व महेंद्र यांच्याशी संवाद साधला. थोडा पाऊस पडला असून बाजरी पेरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
बा विठ्ठला यंदा तरी बरकत येऊ दे...- गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा होत चालली आहे़ त्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसतोय, यात मराठवाडा विदर्भामधील शेतकºयांचे प्रश्न बिकटच आहेत़ तरीही भक्तिभाव श्रद्धा व अनेक वर्षांची पायी वारीची परंपरा सुरू ठेवली आहे़ त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस होईल, चांगलं पीक येईल हीच आशा आणि विठ्ठलावर असलेली श्रद्धा या वारीत असलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर दिसून येत होती़ मैलोन्मैल माऊलींच्या सहवासात पंढरीच्या वाटेवर चालणारा वारकरी मनोमन एकच प्रार्थना करीत होता ‘बा विठ्ठला! यंदा तरी तुझ्या लेकराबाळांना बरकत मिळू दे...’