अप्पासाहेब पाटील
सोलापूर : दुचाकी वाहनांच्या अपघातात, तसेच त्यातील मृतांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यातील बहुतांश अपघात हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मागील ऑक्टोबर महिन्यात ११ हजार ५१८ विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करून ५७ लाख ९० हजार ५०० रुपये दंड केल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने दुचाकी चालवीत असताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी दुचाकीला अपघात झाला तर हेल्मेटमुळे डोक्याला मार न लागता आपला जीव वाचू शकतो. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नागरिक हेल्मेट वापराविषयी कमालीचे बेफिकीर आहेत. त्यांना हेल्मेट वापरणे गैरसोयीचे वाटते. हेल्मेट वापराचे सोलापूर जिल्हावासीयांना गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हेल्मेट वापराविषयी वेळोवेळी जनजागृती करूनही हेल्मेट न वापरणाऱ्या महाभागांवर सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे.
---------
इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून वाहतूक
राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने दररोज कारवाई करण्यात येत आहे. यात अति वेगात वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याने अनेकांवर कारवाई करण्यात येते. माहे ऑक्टोबर २०२१ पर्यंत ई-चालान डिव्हाइस आणि इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या एकूण ११५८१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ५७ लाख ९० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
----------
महामार्गावरील वाढते अपघात व त्यात जीव जाणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या लक्षात घेता महामार्गावर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेटमुळे अनेकांचा जीव वाचल्याच्याही घटना आहेत; परंतु हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाइलाजाने जिल्हा वाहतूक शाखेकडून दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण
अत्याधुनिक कॅमेऱ्यामुळे कारवाई वेगात...
गेल्या ऑक्टोबर महिन्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनाद्वारे कारवाई केली आहे. वाहतूक शाखेला इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनात असलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यामुळे हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या चालकाला लांब अंतरावरून सहज डिटेक्ट करता येऊ शकते. गेल्या महिन्यात ५७ लाख ९० हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.