सोलापूर : अमृत योजनेच्या कामामुळे सोरेगाव जलवाहिनीतून १५ दशलक्ष लिटर पाणी वाढले आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
अमृत योजनेतील काही कामात बदल सुचविण्यात आला आहे. या बदलास परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात अमृत योजनेतून जी कामे हाती घेण्यात आली, त्यामुळे पाण्यात वाढ झाली आहे. फिल्टर बेड व इतर कामांच्या सुधारणेमुळे भविष्यात पाणी वितरणात आणखी सुसूत्रता येणार आहे. काम रखडले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीखेरीज या ठेकेदाराला कोणत्याही कामासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.
गळतीमुळे पाणी वाया जाते. वडकबाळ ते सोरेगाव आणि सोरेगाव ते जुळे सोलापूर टाकीपर्यंत जलवाहिनी जुनी आहे. उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलणे व जॉईन्ट जोडणीचे काम केल्याने गळती कमी झाली आहे. पाकणी शुद्धीकरण केंद्रातील कामे सुरू आहेत. केगाव ते जुने पुणेनाकापर्यंतची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. कॅनॉलजवळील जोड देण्यासाठी शटडाऊन घ्यायचे आहे. पण विजेचा व्यत्यय व जलवाहिनी गळतीमुळे पाणी वितरणात समस्या येत आहेत.
विश्रांती चौकातील जलवाहिनीला मोठी चिर पडली होती. दुरुस्तीला बराचवेळ झाला. अशा कारणांमुळे उजनीवरील शटडाऊन पुढे ढकलले आहे असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. अमृत योजनेतील इलेक्ट्रिक पंप बसविण्याचे काम बडगुजर कंपनीला दिले आहे. या कंपनीने वेळेच्या आधी हे काम केले तर बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे या कंपनीने पंप बदलण्याचे काम सुरू केले आहे. पंप बदलल्यानंतरही पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे. पाणी वितरण व्यवस्था सुधारणेसाठी बरेच प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले.