कुसळंब : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव (आ.) येथे महालक्ष्मी मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा संदर्भात आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नऊ वर्षांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेने मार्फत ४९ हजार घटना हाताळल्याचे सांगितले. प्रत्येक घटनेत ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोर दरोडेखोर जेरबंद करता आले आहेत. एकही प्रकरणात चोर सुटला नाही. आपण फक्त मुके व बहिरे होता कामा नये. ही यंत्रणा ४८ तासात बार्शी तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी सांगितले.
याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे, नायब तहसीलदार संजय मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव उपस्थित होते.
यावेळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकायला मिळणार आहे आणि गुन्ह्याला आळा घालणे शक्य होणार असल्याचे गोर्डे यांनी सांगितले. नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ५९ गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व नागरिकांना पुढील काळात ४८ तासात तुमची गावी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित होईल, असे आश्वासन दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी प्रयत्न केले.
-----------
फोटो: १७ कुसळंब
ग्रामसुरक्षा दलाच्या आढावा बैठकीत संबोधताना डी.के. गोर्डे