करमाळा : दुपारचे १२ वाजलेले...मोठ्या आवाजात धडधडणारी मळणी मशीन...कुटुंबातील सारेच टोपली भरून धान्य देत होते... भुसकट गोळा करण्यासाठी घरकर्ती खाली वाकली...वाऱ्यामुळे डोक्यावरचे केस मळणी मशीनमध्ये सापडले...इतक्यात मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला अन् काही कळायच्या आत क्षणात पतीसमोरच तिचे शीर धडावेगळे झाले. नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मळणी मशीनमध्ये केस सापडून महिला मरण पावल्याची दुर्दैवी घटना पोथरे (ता. करमाळा) येथे घडली. उषा पंडित झिंजाडे (४२) असे त्या शेतकरी कुटुंबातील घरकर्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी शेतातील वस्तीवर ही घटना घडली.
सध्या ग्रामीण भागात सुगीच्या कामांनी वेग घेतला आहे. येथील शेतकरी पंडित झिंजाडे, मुलगा अनिकेत झिंजाडे व पत्नी उषा झिंजाडे हे तिघेजण दुपारी यंत्रावर ज्वारी मळीत होते. हे काम संपत आले होते. इतक्यात मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी उषा झिंजाडे या खाली वाकल्या. भुसकट काढण्यात मग्न असताना ट्रॅक्टरवर जोडलेल्या मळणीयंत्राच्या शाप्टमध्ये उषा यांच्या डोक्यावरील केस अडकले. शाप्ट गोल फिरत असताना त्या आत ओढल्या गेल्या आणि डोके आत गेले. काही क्षणात डोके शरीरापासून वेगळे झाले. काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. हा अपघात थांबवायला झिंजाडे कुटुंबाला वेळेेने संधीच मिळू दिली नाही. घटना समजताच पोलिसांनीही वस्तीवर धाव धेतली. उषा यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार झाले.
उषा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
-----
अन् काहींच्या दारात धाटांची पूजाच झाली नाही
नव्याच्या पौर्णिमेनिमित्त गावात घराघरात पूजेची तयारी सुरू होती. दारात ज्वारीची धाटे लावून पूजा करण्यात काहीजण गुंतले हाेते. अशात ही दुर्दैवी घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. काही लोकांनी पूजा थांबवून वस्तीवर धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. आईचा मृतदेह पाहून मुलगा आणि मुलीने एकच हंबरडा फोडला. या घटनेबाबत गावातून हळहळ व्यक्त झाली.
---
आठवडी बाजारामुळे स्वत:च्या शेतात आले मळणीला
झिंजाडे कुटुंब हे मोलमजुरी करून उपजीविका भागवत आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही दहावी-अकरावीचे शिक्षण घेतात. या कुटुंबाला दोन एकर जमीन असून, त्यात त्यांनी ज्वारी पेरली होती. दररोज दुसऱ्यांच्या शेतामध्ये ज्वारी काढणीला आणि मळणीला जाणाऱ्या झिंजाडे कुटुंबीयांनी शुक्रवार आठवडी बाजार असल्याने दुसऱ्यांच्या शेतातील मजुरीला सुटी घेतली आणि स्वत:च्या शेतातील ज्वारी मळणीचे काम हाती घेतले होते.
---
२६ उषा झिंजाडे
२६ पोथरे
पोथरे येथे वस्तीवर मळणी मशीनमध्ये सापडून महिला मरण पावल्याच्या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.