दुधनी येथील शेतकरी रमेश निंबाळ यांची गावात कोणाबरोबर कधीच तक्रार झाली नव्हती. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ते व त्यांची पत्नी फिर्यादी लक्ष्मी रमेश निंबाळ हे दोघे शेतातील लक्ष्मीचे दर्शन करून परत घरी येत होते. तेव्हा गावातील रूपा भवानी मंदिराजवळ सैदप्पा भेटला. तो रमेश याला तिथूनच घेऊन चालला होता; पण पत्नीने नकार दिल्याने दोघे घरी गेले. सैदप्पा पुन्हा घरी रमेशच्या गेला आणि ‘आपण दोघे केळी, द्राक्षे घेऊन येऊ,’ असे म्हणून बळजबरीने स्वतःच्या मोटारसायकलवरून घेऊन गेला. नंतर धारदार शस्त्राने पोटात चार ते पाच वेळा भोसकून खून केल्याचे पत्नीने जबाबात म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीस अटक केली.
घटनास्थळी शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक चंदू बेरड यांनी जाऊन पाहणी केली. आरोपी सैदप्पा व्हसुरे याला अटक करून येथील न्या. जी. बी. नंदागवळे यांच्यासमोर उभे केले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादीतर्फे सरकारी वकील गिरीश सरवदे यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बेरड करीत आहेत.
जेवणासाठी पती न आल्याने पत्नीची शोधाशोध
दुपारी १२.३० वाजले तरी पती जेवणासाठी कसे काय आले नाहीत म्हणून पत्नीने पतीला मोबाईल लावला. दोन्ही नंबर बंद होते. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत पत्नीने नातेवाइकांना सांगितले. नंतर शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, दुधनी-बडदाळ बैलगाडी रस्त्यावर धारदार शस्त्राने खून करून त्याला टाकून दिले आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून तत्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री उशीर झाल्याने शनिवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुधनी येथे अंत्यविधी करण्यात आला.