तालुक्यात शिंगोर्णी, बचेरी, सुळेवाडी, जळभावी, गिरवी, कारूंंडे, कोथळे, पिंपरीसह ३० ते ३५ गावातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन वर्षातून ८-१० महिने भटकंती करतात. अलीकडे मेंढपाळ व्यवसायावर आधुनिकतेचा पगडा दिसू लागल्याने बंदिस्त शेळीपालनाचा पर्याय पुढे आला आहे. तरीही मेंढीपालनासाठी भटकंती कायम आहे.
गेले काही वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे मेंढपाळ चाऱ्याअभावी गावाकडे फिरकत नव्हते. परंतु, यावर्षी रिमझिम पावसाने वेळीच सुरुवात केल्याने गाव शिवारासह पठारांवर चारा उपलब्ध झाला आहे. हिरवेगार झालेले डोंगर, नाले, ओढे यात मेंढ्यांना मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा मेंढपाळांचे कळप तालुक्यातील शिवारातच रेंगाळताना दिसत आहेत.
यंदा गणित जुळलं
दिवाळीच्या पाडव्याला मेंढरं देवाच्या दर्शनाला आणून देवाला प्रदक्षिणा घालून मेंढरांचे खांडवे चाराईसाठी निघतात. ४०० ते ५०० कि.मी. अंतर पुढे भटकंती करतात. गावाकडे राेहिणी, मृग नक्षत्रांत पाऊस पडला की पुन्हा गावाकडे परतीचा प्रवास सुरू होतो. गावाकडे पाऊस पडला तर गवत वाढू लागते. मेढरांचे खांडवे ज्येष्ठ-आषाढापूर्वी गावात दाखल होतात. मात्र, अलीकडील काळात दुष्काळाच्या फटक्यात मेंढपाळीचा हा क्रम राहिला नव्हता. यावर्षी पाऊस पडल्यामुळे मेंढपाळ गावावर येण्याचं, चाऱ्याचं गणित यंदा जुळल्याचे दिसत आहे.
कोट :::::::::::::::::
यावर्षी मोठा पाऊस नाही, पण रिमझिम पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना पोषक खाद्य सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे मेंढपाळांचे खांडवे नेहमीप्रमाणे दिवाळीपर्यंत गावावर थांबतील व त्यानंतर भटकंती सुरू होईल.
- भानुदास चोरमले, जळभावी