सोलापूर - माणसाने केलेल्या चांगल्या, वाईट कर्माचा हिशेब त्याला इथेच चुकता करावा लागतो. धनसंपत्ती, पैसाअडका लाख कमावला तरी शेवटी हाती काय लागणार? हे संतवचन आजही समाजाला आदर्श जीवन पद्धतीकडे नेत आहे. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. पायाला भिंगरी बांधल्यागत ऐहिक आणि भौतिक सुखाच्या मागे माणूस धावत सुटला आहे.
मनस्वास्थ हरवून बसलेल्या माणसाला आजला नाना आजार-विकारांनी घेरले आहे. माणसाचे अचानक जाणे, मनाला चटका लावून जात आहे. विज्ञानयुगामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. वैद्यकीय सोयीसुविधांमुळे माणसाचे आयुर्मानही वाढत आहे, हे जरी शंभर टक्के खरे असले तरी लहान, थोर, तरुण ते अगदी मध्यम वयाच्या माणसाच्या मरणाला आता वयाचे बंधन उरलेले नाही. माणसाचे हे अकाली जाणे शोकसागरात बुडवत आहे.
दलती जीवनशैली (लाईफस्टाईल) त्याला कारण. हृदविकार, डेंग्यू, मलेरिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग नाना विकारांनी माणूस पोखरला आहे. बी-पॉझिटिव्ह, थिंक-पॉझिटिव्ह. सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा..! हा आरोग्यमंत्र वारंवार वाचनी व कानीही पडत आहे. पण, एखादी गोष्ट अंगवळणी पडल्यावर काय? तेच आपल्या दैनंदिन जीवनशैलीचं झालं आहे. अरबट, चरबट, तेलकट, तुपट, खारट, तिखट, आंबट. जिभेचे लाड पुरवण्यासाठी कधीपण, कायपण. आहार, विहार, व्यायाम, खेळ, मनोरंजन घडय़ाळाचा काटा काहीच करू देत नाही. म्हणे, माझं दिवसभराचं वेळापत्रक खूप व्यस्त असतं.
- रामचंद्र जाधव, सोलापूर