श्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) जगदीशनगरमधील अरुण चव्हाण यांनी आपल्या गोकुळी नावाच्या खिलार देशी गायींचे पहिले डोहाळे थाटामाटात साजरे केले. खिलार गाईचे अस्तित्व टिकविण्यासाठी हा उपक्रम केल्याचे अरुण चव्हाण यांनी सांगितले.
अरुण चव्हाण यांनी गोकुळीला गजरे, बेगड, झूल घालून सजविले होते. तसेच त्यांचे पै पाहुणे आणि परिसरातील महिलांनी या कार्यक्रमासाठी ओटीचे साहित्य, कपड्याचे आहेर घेऊन हजेरी लावली. प्रारंभी महाळुंग गावच्या सरपंच उषा विजय भोसले यांनी गायीची प्रथम ओटी भरून पूजा केली. गायीच्या मालकीण सिंधू अरुण चव्हाण, शालन अभिमान चव्हाण, मोनाली दत्तात्रय चव्हाण, सविता शहाजी जाधव, स्वाती भागवत पारसे, वनिता दावल शिवशरण, रेखा राजू नवगिरे, राणी विश्वजीत बाबर, उज्ज्वला उमेश फलटणकर या महिलांनी पांढºया रंगाच्या देशी खिलारी गाईच्या प्रथम डोहाळे जेवणानिमित्त ओटी भरून पूजा केली. आरती ओवाळली, गाईला केळी, चिक्कू, सफरचंद, पुरणपोळी पदार्थ खायला दिले.
परिसरातील नागरिकांनी, महिलांनी, लहान मुलांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपात गर्दी केली होती. अरुण चव्हाण यांनी या गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त सर्वांना स्नेहभोजन देखील दिले़ देशी गायीची जमात कमी होत चालली आहे हे लक्षात घेऊन अरुण चव्हाण यांनी गोकुळीचे पहिल्याच वर्षात डोहाळे घालून सर्व शेतकरी व जनावरे पाळणाºयांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे़
गाय ही गोमाता आहे तिचे पूजन केले पाहिजे़ जे सध्या दुर्मिळ होत चाललेल्या या खिलार गायींचे अस्तित्व टिकवण्यासाठी मी हा उपक्रम घालून गोमाता पूजन केले आहे़. या गायीचे डोहाळे जेवण घातलेले आहे़ असाच उपक्रम अन्य शेतकरी बांधवांनी राबवावा, अशी अपेक्षा आहे़- अरुण चव्हाण, गोपालक