पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे भोई समाज संघटनेच्यावतीने नदीपात्रामध्ये शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली़ गेल्या सहा वर्षापासून भोई समाज संघटनेच्यावतीने नदीपात्रामध्ये शिव प्रतिमेची स्थापना केली जाते. प्रत्येक वर्षी विविध किल्ल्याचे देखावे पाण्यामध्ये करून शिव प्रतिमेची स्थापना करण्याचा हा उपक्रम सुरूच आहे.
दरम्यान, प्रवीण नगरे आणि सूरज नजरे या कलाकारांनी आठ फूट उंचीची शिवप्रतिमेची मूर्ती स्वत: बनवून भीमा नदीच्या पात्रामध्ये स्थापन केली आहे. नदीतील शिवप्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची गर्दी होत आहे.
कौठाळी येथे शिवक्रांती परिवाराच्यावतीने गेल्या २४ वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घराघरात गेल्या आठ वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा करतात. घराघरात शिवजयंती उत्सव साजरा करणारे कोठाळी हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा शिवजयंती उत्सव सजावट स्पर्धा किल्ला स्पधेर्चेही आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्यामुळेच प्रविण नगरे, सुरज नगरे यांना यातूनच प्रेरणा मिळत गेली.